मेक्सिको सिटी : शहराच्या उत्तरेस असलेल्या ऐतिहासिक तेओतिउआकान पिरॅमिडपैकी एकाच्या शिखरावर सशस्त्र हल्लेखोराने पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात सोमवारी एक कॅनेडियन नागरिक ठार झाला, तर किमान १३ जण जखमी झाले. हल्लेखोराने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी एक बंदूक, चाकू आणि काडतुसे सापडली. या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकची हद्दबंदी वाढली
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची मुदत मंगळवारी २४ मेपर्यंत वाढवली. मागील एक वर्षाहून अधिक काळ हे निर्बंध लागू आहेत. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपापले हवाई क्षेत्र बंद केले आहे. भारताने पाकिस्तानी विमानांना घातलेल्या बंदीची मुदत २४ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजेपर्यंत असून, ती वाढवली जाण्याची शक्यता आहे.
सौदीकडून पाकला मदत
कराची : पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून एक अब्ज अमेरिकी डॉलरचा दुसरा आणि अंतिम हप्ता प्राप्त झाला आहे. एकूण तीन अब्ज डॉलरच्या मदतीच्या पॅकेजचा हा भाग आहे. परकीय गंगाजळी वाढवण्याच्या उद्देशाने हे पॅकेज दिल्याचे पाकिस्तानच्या स्टेट बँकेने मंगळवारी सांगितले होते. गेल्या आठवड्यात दोन अब्ज डॉलरचा पहिला हप्ता देण्यात आला होता. पश्चिम आशियात शांततेसाठी राजनैतिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी पाकचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाला भेट दिल्यानंतर हे नवे कर्ज मिळाले.
‘गुरुवायूर’ला पशुरुग्णालय
त्रिशूर : केरळमधील गुरुवायूर येथे श्री कृष्ण मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या देवस्वोम बोर्डाअंतर्गत हत्ती आणि गुरांसाठी मल्टी-स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या ‘वनतारा’ या प्राणी पुनर्वसन उपक्रमातील उच्चस्तरीय तज्ज्ञ पथकाने अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या व्यवहार्यता तपासणीसाठी गुरुवायूरला भेट दिल्याची माहिती देवस्वोमने मंगळवारी दिली. या पथकाने गुरुवायूर मंदिराच्या पुन्नथूर कोट्टा या प्रसिद्ध हत्ती शिबिराची पाहणी केली.







