गोरखपूरहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात एका ज्येष्ठ प्रवाशाची प्रकृती अचानक खालावल्याने सोमवारी रात्री नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आले. दुर्दैवाने, उपचारापूर्वीच या प्रवाशाचा मृत्यू झाला. सुमन कुमार चौधरी (वय ६०) असे मृत प्रवाशाचे नाव आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, स्पाइसजेटचे एसजी ५५५ हे विमान सोमवारी रात्री गोरखपूरहून मुंबईकडे झेप घेत होते. विमान हवेत असतानाच, सीट नंबर ६-बी वर बसलेले सुमन कुमार चौधरी अचानक बेशुद्ध पडले. ही बाब विमान कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच विमानात तातडीने मेडिकल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने जवळच असलेल्या नागपूर विमानतळाशी संपर्क साधला आणि परवानगी घेत विमान नागपूरकडे वळवण्यात आले. रात्री १० वाजताच्या सुमारास विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. विमानतळ प्रशासनाने आधीच धावपट्टीवर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवले होते. किम्स-किंग्सवे हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतील डॉ. अखिल आणि परिचारिका शीतल यांनी तातडीने रुग्णावर प्रथमोपचार केले. चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या उपस्थितीत तातडीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे हलवण्यात आले, अशी माहिती किम्स- किंग्स्वेचे ब्रॅण्डिंग आणि कम्युनिकेशन्स प्रमुख एजाज शमी यांनी दिली. मेयोमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सुमन कुमार चौधरी यांना तपासून मृत घोषित केले. मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचे मेयोचे अधिष्ठाताना डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, पुढील कार्यवाही पूर्ण करून विमान सोमवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाले होते.







