नोंदविणार चार पीडितांचे बयाण

महाराष्ट्र टाइम्स

मानकापूर पोलीस धर्मांतरण सक्तीच्या प्रयत्नाप्रकरणी चार पीडितांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर बयाण नोंदवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा अध्यक्ष रियाज फाजील काझीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या घरातून लॅपटॉपसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. लॅपटॉपमधील डेटा डिलिट झाल्याने तपासात अडथळे येत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

police efforts to record statements of four victims controversy over forced conversion

स्वयंसेवी संस्थेआड तरुणींशी अश्लील चाळे करून धर्मांतरण सक्तीचा प्रयत्न केल्याप्रकरणातील चार पीडितांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर बयाण नोंदविण्यासाठी मानकापूर पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. याबाबत पोलिसांनी न्यायालयाला परवानगीही मागितली आहे.

धर्मांतरण सक्तीप्रकरणात पोलिसांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा अध्यक्ष रियाज फाजील काझी (वय ४८, रा. झिंगाबाई टाकळी) याला अटक केली असून त्याची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. पोलिसांनी सोमवारी काझी याचे घर व कार्यालयाची झडती घेतली. पोलिसांनी लॅपटॉपसह संबंधित दस्तऐवज जप्त केले. लॅपटॉपमधील डेटा डिलिट झाल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. हा डेटा रिकव्हर झाल्यानंतर पोलिसांना धर्मांतरणप्रकरणाशी संबंधित पुरावे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काझीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पीडितांचे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १८३ अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, एका पीडितेच्या नातेवाइकानेही धर्मांतरण केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता सुमारे दहा वर्षांपूर्वी स्वमर्जीने धर्मांतरण केल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याचा काझी प्रकरणाशी संबंध नाही, असेही अधिकाऱ्याने सांगितले. मानकापूर पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक व गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मंगळवारीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काझीबाबत माहिती घेतली. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा तपासही एटीएस करीत आहे.