‘काँग्रेस नेते पवन खेरा हे ‘फ्लाइट रिस्क’ (देश सोडून पळून जाण्याची भीती असलेले) नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्याची कोणतीही गरज नाही,’ असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात केला. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरप्रकरणी खेरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. न्या. पार्थिव ज्योती सैकिया यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तीन तास ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे.‘मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता ही कारवाई सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे दिसते,’ असे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. आसामचे महाधिवक्ता देवजित लोन सैकिया यांनी जामिनाला विरोध केला. हे प्रकरण मानहानीचे नसून, कागदपत्रांची फेरफार व फसवणुकीचे असल्याचे ते म्हणाले. खेरा यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे अनेक पासपोर्ट आणि परदेशात अघोषित मालमत्ता असल्याचा आरोप केला होता.








