खासगी कंपनीसाठी ड्रोनआयातीची परवानगी मिळवण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या ( डीजीसीए ) उड्डाणयोग्यता संचालनालयाचे उपमहासंचालक एम. देवुला आणि ॲस्टेरिया एरोस्पेस लिमिटेड या ड्रोन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत माथुर या दोघांना सीबीआयने शनिवारी अटक केली.
सीबीआयने माथुर, देवुला यांच्यासह ॲस्टेरिया एरोस्पेस कंपनीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता, २०२३च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. ॲस्टेरिया एरोस्पेस ही ड्रोन तंत्रज्ञान कंपनी ज्या बड्या उद्योगसमूहाचा भाग आहे, त्या समूहाचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नमूद नाही. डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगी एरोस्पेस कंपनीच्या प्रलंबित अर्जांना मंजुरी देण्याच्या बदल्यात खासगी व्यक्तींकडून अनुचित लाभाची मागणी केल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे.









