सर्व लघुउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चौधरी प्रतिष्ठानतर्फे लक्षिका मंगल कार्यालय येथे ‘ बिझनेस मीट ’ पार पडली. या उपक्रमात १२५ हून अधिक महिला उद्योजिका एकत्र आल्या, तर त्यांच्या व्यवसायांविषयी जाणून घेण्यासाठी शंभराहून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘इतनी शक्ति हमें देना दाता...’ या प्रार्थनेने करण्यात आली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या ईडीपी प्रकल्प अधिकारी आरती शेलोनकर यांनी शासकीय योजना व अनुदानाबाबत मार्गदर्शन केले, तर सोशल मीडिया तज्ज्ञ चिन्मय पाठक यांनी ‘डिजिटल ब्रँडिंग’विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. नामको चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महिलांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तृप्तीदा काटकर यांनी महिला उद्योजिकांच्या व्यवसायाचे वर्गीकरण सादर केले. यावेळी वृंदा लव्हाटे, माधुरी जाधव, सुरेखा पंडित, लीना भट, योगेश कासार, प्रशांत अलई, रेखा कदम, संगीता वेढणे उपस्थित होते.








