फटाक्याच्या कारखान्यातस्फोट; १८ कामगार ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका खासगी फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १८ कामगारांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोट इतका मोठा होता की कारखान्याच्या तीन खोल्या उद्ध्वस्त झाल्या. मदतकार्यात अडथळे आले. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

फटाक्याच्या कारखान्यातस्फोट; १८ कामगार ठार

तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका खासगी फटाका कारखान्यात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कट्टानारपट्टीजवळील वचकारपट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुथुमाणिक्कम यांच्या मालकीचा ‘वनजा फायर वर्क्स’ हा कारखाना आहे. या कारखान्यात रविवारी सकाळी काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की कारखान्यातील तीन खोल्या उद्ध्वस्त झाल्या.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या सहा जणांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर विरुधुनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून, त्या ६० टक्क्यांहून अधिक भाजल्या आहेत. स्फोट झाला तेव्हा या संकुलात शंभरहून अधिक मजूर कामावर होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या समोरील व्हरांड्यात फटाक्यांना अंतिम स्वरूप देण्याचे आणि कच्च्या मालाची हाताळणी करण्याचे काम सुरू होते. त्या वेळी हा स्फोट झाला. स्फोटानंतर बराच वेळ फटाक्यांचे आवाज येत राहिल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. पोलिसांनी आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढले असून, त्यापैकी अनेक मृतदेह ओळखता न येण्याइतपत होरपळले आहेत.