महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ‘ब’ व ‘क’ पदांसाठी २०२५-२६ या वर्षातील स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी दुसरी तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून, याद्वारे ११८ विद्यार्थ्यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ न घेतल्याने तसेच काहींची दुबार निवड झाल्याने रिक्त जागा निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर रिक्त जागांसाठी दुसरी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामान्य, महिला, दिव्यांग, अनाथ व वंचित प्रवर्गानुसार स्वतंत्र निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून, ११८ विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड तर ४८ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम प्रवेश दिला जाणार असून, प्रशिक्षणासंदर्भातील पुढील सूचना बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.








