‘पॉश’ची प्रभावी अंमलबजावणी गरजेची

महाराष्ट्र टाइम्स

कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'पॉश' कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक आहे. अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (आयमा) आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षक ऋता पंडित यांनी मार्गदर्शन केले. दहाहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनेत अंतर्गत तक्रार समिती असणे बंधनकारक आहे. या कायद्याबाबत ग्रामीण व असंघटित क्षेत्रात जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.

‘पॉश’ची प्रभावी अंमलबजावणी गरजेची
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पॉश’ कायदा महत्त्वाचा आहे. मात्र, कायदा असणे पुरेसे नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती आवश्यक आहे, असे मार्गदर्शन प्रशिक्षक व समुपदेशक ऋता पंडित यांनी केले.

अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) वतीने आयमा सभागृहात आयोजित ‘पॉश’ कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. ‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन, मनुष्यबळ व्यवस्थापन समिती अध्यक्ष अलोक कनानी, खजिनदार अविनाश बोडके, सचिव दिलीप वाघ, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील मंचावर उपस्थित होते. पंडित म्हणाल्या, ‘पॉश हा कार्यस्थळी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणारा महत्त्वाचा कायदा आहे. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध करणे, तक्रारींचे निवारण करणे व दोषींवर कारवाई करणे त्यात अपेक्षित आहे. ग्रामीण व असंघटित क्षेत्रात या कायद्याबाबत जागरूकतेचा अभाव आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रम हाती घ्यायला हवेत.’

प्रताप पाटील यांनी सांगितले की, ‘दहाहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनेत अंतर्गत तक्रार समिती आवश्यक असून, ती नसल्यास पन्नास हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे.’

राजेंद्र पानसरे म्हणाले की, ‘नाशिकमध्ये एका आस्थापनेतील लैंगिक छळ प्रकरणात आस्थापनेची चूक नाही. एका मनोवृत्तीतून ही घटना घडली आहे.’ सरचिटणीस संजय महाजन यांनी आभार मानले.

यावेळी योगिता आहेर, माजी सरचिटणीस प्रमोद वाघ, माजी कोशाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, रवींद्र महादेवकर, अभिषेक व्यास, रणजित सानप, ज्योत्स्ना पाटणकर, सोनाली पाटील, सायली कुलकर्णी, हरदीप कौर, वनशिखा शिंदे, गोविंद बोरसे आदींसह विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.