बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या आठवड्याभरात नाशिक जिल्ह्यातील केवळ ८३८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
‘आरटीई’ प्रवेशाला यंदा सुरुवातीपासूनच धिम्या गतीने प्रतिसाद मिळत असून, कागदपत्रातही अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अद्याप ८५ टक्के प्रवेश बाकी आहेत. शिक्षण संचालनालयाच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आजअखेर प्रवेश निश्चित करता येणार आहे.
पंधरा टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
जिल्ह्यात ही प्रवेश प्रक्रिया सुरू असून, रविवारपर्यंत (१९ एप्रिल) जिल्ह्यातील केवळ ८३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, या प्रवेशांसाठी पालकांना अजअखेर मुदत देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील ‘आरटीई’ पात्र ३९४ शाळांमध्ये ५ हजार ६७३ राखीव जागा आहेत. यासाठी १७ हजार ५४२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५ हजार ३२६ विद्यार्थ्यांची निवड यादी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली होती. परंतु, या निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश पूर्ण न झाल्याने, अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. हा विचार करता, उद्यापर्यंत या प्रवेशासांठी मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी ‘एसएमएस’ पाठवला असून, हे पालक प्रवेश निश्चितीसाठी पडताळणी समितीकडे येत आहेत. समितीसमोर पालकांना अर्जामध्ये दाखल प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सादर कराव्या लागत आहेत. या कागदपत्रांची तपासणी करून, त्यामध्ये त्रुटी नसल्यास समितीमार्फत ऑनलाइन प्रवेश निश्चित केला जात आहे. यानुसार समितीकडून स्लिप घेऊन पालकांना संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागत आहे. परंतु, कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान अनेक त्रुटी समोर येत आहेत. या त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय प्रवेश निश्चित करण्यास परवानगी नसल्याने, प्रवेशाची गती मंद असल्याचे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले.









