पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’मधून पहिल्या टप्प्यात बस आणि कार या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयाकडून (वाहतूक) याबाबतचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील १३.३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे पुढील महिन्यात उद्घाटन करण्याच्या जोरदार हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), परिवहन विभाग आणि सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. यामध्ये मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतरच्या वाहतूक व्यवस्थापन योजनांचा आढावा घेण्यात आला. एक्स्प्रेस वेववरील वाहतुकीमध्ये कार आणि बसचे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे, तर ३० टक्के अवजड वाहनांचा समावेश आहे. मिसिंग लिंकवरून पहिले सहा महिने कार आणि बसची वाहतूक चालेल. या निर्णयाबाबत पुणे महामार्ग पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, पावसाळ्यानंतर मर्यादित स्वरुपात मालवाहू वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. या काळात मिसिंग लिंकच्या वाहतुकीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
दरम्यान, अवजड वाहनांमुळे घाट क्षेत्रात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते; तसेच अपघातांनाही अवजड वाहनेच कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मिसिंग लिंक कार्यान्वित झाल्यानंतर बोरघाटातील वाहतुकीवरील ताणही जवळपास ७० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. हलकी वाहने व कारमधून जाणाऱ्यांना कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव घेता येऊ शकतात; तसेच अवजड वाहनचालकांनाही घाट क्षेत्रातील वर्दळ घटल्याचा दिलासा मिळू शकतो, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ अतिज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला होता. त्यानंतर जवळपास तीस तासांहून अधिक काळ एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे असून, आशियातील सर्वात मोठ्या लांबीचा (८.९२ किलोमीटर) बोगदा आहे. यात ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाल्यास मदतकार्यात अनेक मर्यादा येऊ शकतात आणि ते धोक्याचे ठरू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकने वाहतुकीला कायमची बंदी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.







