२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवादी पीर पंजाल टेकड्यांमधून हल्लास्थळी आले. तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांनी त्यांचा धर्म विचारून घेतला. त्यांना कलमा म्हणण्यास सांगितला. त्यानंतर प्रत्येकाला गोळ्या घालण्यास सुरूवात केली. यात २६ जणांचा बळी गेला. तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते.
हल्ल्याचे सूत्रधार
हा हल्ला ‘द रेजिस्टंट फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने केला. ‘लष्करे तोयबा’चा संस्थापक हाफीज सईद आणि सैफुल्ला खालिद कासुरी हे दोघे या हल्ल्याचे सूत्रधार आहेत. हशिम मूसा उर्फ सुलेमान शाह हाही सूत्रधार असून, तो जम्मू-काश्मीरमध्ये लपल्याचे समजते.तो पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचा पॅरा कमांडो आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट आहे.
भारताचे प्रत्युत्तर
या हल्ल्यानंतर भारताने तातडीने काही राजनैतिक पावले उचलली. यात सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आली. ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना एक मे २०२५पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना असलेली सार्क व्हिसा सवलत योजना बंद करण्यात आली. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना 'पर्सना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आले. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम
बुधवारी, सात मे २०२५ रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या मोहिमेस 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि आदेश ज्या तळांवरून दिले गेले. ती ठिकाणे या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आली. पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या वचनाचे पालन करून ही मोहीम राबविली असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार मुरीदके, बहावलपूर, मुजफ्फराबाद, सियालकोट, कोटली अब्बास, कोटली गुलपूर, भिंबर या ठिकाणी असलेल्या जैश ए मंहमद, लष्करे तोयबा आणि टीआरएफच्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. यात ‘जैश’चा म्होरक्या मौलाना मसूद अझरच्या कुटुंबीयातील १० जण मारले गेले. त्याशिवाय ९० दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले.
साहसी शोधकार्य ‘ऑपरेशन महादेव’
पुराव्यांच्या आधारे पहलगाम हल्ल्यातील सुलेमान उर्फ आतिफ, जिब्रान आणि हमजा अफगाणी या तीन दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्यांना ठार करण्यासाठी ‘ऑपरेशन महादेव’ आखण्यात आले. हल्ला केल्यानंतर संबंधित दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या दाट जंगलात लपले. लष्कराने ड्रोन आणि अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविली. १० जुलै २०२५ रोजी लष्कराने दहशतवादी असलेल्या परिसरात वेढा घातला. २८ जुलै २०२५ रोजी अत्यंत कठीण असलेली ही शोधमोहीम पूर्णत्वास गेली आणि पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.







