बोगस खाते उघडलेल्या ३२ जणांपैकी दोघांचा २०२१ मध्ये करोना काळात मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही ३१ ऑक्टोबर २०२३पर्यंत त्यांच्या नावावरील खात्यांवर लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
तालुक्यातील कुंदेवाडी येथील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल ३२ बोगस बचतखाती उघडून कोट्यवधींची उलाढाल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित अशोक खरातसह पतसंस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी व संचालक मंडळाविरुद्ध सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४७ वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादीवरून हा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी संगनमताने खातेदारांची ओळख पडताळणी न करता बचत खाती उघडल्याचा आरोप आहे. या खात्यांमधून १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आर्थिक व्यवहार केले. यात फिर्यादीच्या नावावरील खात्यातूनच ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. बोगस खाती उघडलेल्या ३२ जणांमध्ये अशोक खरातचा भाऊ, भावजयी, चुलत भाऊ व त्यांची पत्नी, मुलगा, पुतणी, भाचा, मामा, काका; तसेच काही दूरच्या नातलगांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक जण कधीही या पतसंस्थेत गेलेले नाहीत.







