अहिल्यानगर : जलसंपदा विभागाच्या वतीने जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रा काढण्यात येणार आहे. जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्री क्षेत्र चोंडी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप श्री क्षेत्र महेश्वर (मध्य प्रदेश) येथे होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; तर चोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात्रेला प्रारंभ होईल. यात्रेचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल तिथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेत ५०० जलयात्री व चित्ररथ सहभागी होणार आहेत.







