...तेव्हा प्रतिसाद निर्णायक असतो

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय लष्कराने दहशतवादाला निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू ठेवल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्यातील सूत्रधारांना ठार करण्यात आले असून, सात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बळी गेलेल्यांसाठी स्मारक उभारण्यात आले आहे.

...तेव्हा प्रतिसाद निर्णायक असतो

‘काही मर्यादा कधीही ओलांडू नयेत. जेव्हा मानवतेच्या सीमा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रतिसाद निर्णायक असतो,’ अशा शब्दांत भारतीय लष्कराने मंगळवारी दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला.

पहलगाममध्ये बैंसरन व्हॅली येथे गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यावर लष्कराने मंगळवारी दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला. लष्कराने ‘एक्स’वर पोस्ट केली. ‘जेव्हा मानवतेच्या सीमा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रतिसाद निर्णायक असतो. न्याय मिळाला. भारत एकसंध आहे,’ असे लष्कराने त्यात म्हटले. ‘भारत विसरलेला नाही’ असेही लष्कराने म्हटले आहे.

ही पोस्ट अत्यंत प्रतीकात्मक असून त्यात भारताच्या नकाशाची सिल्हूट प्रतिमा असलेले एक डिजिटल पोस्टर आहे. ‘काही सीमा कधीच ओलांडू नयेत,’ असे लिहिले आहे. इंग्रजीत असलेल्या या पोस्टरमधील ‘CROSSED’ या शब्दातील ‘O’ हे अक्षर सिंदूराने भरलेल्या वाटीच्या रूपात दाखवण्यात आले आहे आणि त्याखाली ‘भारत कधीच विसरणार नाही’ असे लाल रंगाने म्हटले आहे.

या हल्ल्यानंतर लष्कराने ‘ ऑपरेशन सिंदूर ’ सुरू केले. सात मे रोजी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्बफेक करण्यात आली. त्या वेळी केलेल्या ट्वीटमध्येही सिंदूराने भरलेल्या वाटीचा उपयोग करण्यात आला होता. तसाच आजच्याही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरूच असल्याचे भारतीय नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या हत्याकांडात सहभागी असलेले तिन्ही पाकिस्तानी सूत्रधारांना तीन महिन्यांनंतर श्रीनगरच्या टेकड्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ठार केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तपास सुरू ठेवला असून, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा, त्याची संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) आणि सीमेपलीकडून कारवाया करणाऱ्या एका हँडलरसह सात आरोपींविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले.

या हल्ल्यात बळी पडलेल्या २६ जणांची नावे कोरलेले काळ्या संगमरवरी दगडाचे स्मारक लिडर नदीच्या काठावर उभारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पहलगाम आणि परिसरात अतिरिक्त पोलिस व निमलष्करी जवान तैनात केले आहेत. अनेक ठिकाणी तपासणी तीव्र करण्यात आली असून, शांततापूर्ण स्मरणसोहळा पार पाडण्यासाठी पाळत वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की या कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अनेक राजकारणी, नागरी समाजाचे सदस्य, बळी गेलेल्यांचे कुटुंबीय उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.