सातारा : कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीची दुचाकीशी समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजू विठ्ठल झोरे (२५) आणि पत्नी राणी राजू झोरे (वय २३, रा. सडादाढोली) अशी मृतांची नावे असून, त्यांचा दहा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की राजू व राणी हे नवविवाहित जोडपे दुचाकीवरून शिराळा येथे नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये राजूचा जागीच मृत्यू झाला; तर रुग्णालयात घेऊन जात असताना राणीचा मृत्यू झाला. पिकअप चालक सचिन यशवंत मोहिते (रा. बोंद्री) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.







