बारामतीमध्ये अजित पवार यांनी विविध विकासकामे उभी केली. तोच वारसा सुनेत्रा पवार पुढे नेतील. दादांच्या पश्चात त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला सारून जनतेच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची कार्यक्षमता मी पाहिली असून, दादांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या रूपाने उपमुख्यमंत्रीच नाही, तर सक्षम नेतृत्व लाभले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांबद्दल गौरवोद्गगार काढले. बारामतीकरांनी विक्रमी मतांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
ही निवडणूक अजितदादांच्या स्मृतींचा यज्ञ आहे. यज्ञात आपली आहुती दिली नाही, तर काही तरी राहून गेले असे आयुष्यभर वाटले असते. म्हणून ती आहुती टाकण्यासाठी आणि दादांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. २३ तारीख ही दादांवरचे प्रेम व्यक्त करण्याची त्यांना श्रद्धांजली वाहण्याची तारीख आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी एक्सवरून दिली. गेली ५८ वर्षे सातत्याने मी मतदान करत असून प्रथमच ते शक्य होणार नाही, असे म्हणत आमच्या पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला असून, अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजली आहे. बारामतीमधील सर्व मतदारांनीही त्यांना मतदान करावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.







