नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाही सभासदांनी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना पदाधिकाऱ्यांकडून थेट उत्तरे न मिळाल्याने वातावरण तापले होते. शनिवारी (दि. २५) एप्रिल रोजी व्याख्यानमालेच्या सभागृहात अध्यक्ष श्रीकांत बेणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत परदेशी वक्त्यांवरील खर्च, स्थानिक प्रतिभांना संधी न मिळणे आणि संस्थेच्या कामकाजातील पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. या गदारोळातच आगामी वर्षासाठी तब्बल ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आणि बहुमताने मंजूरही करण्यात आले.
सभेत विश्वास मदाने यांनी परदेशी वक्त्यांच्या प्रवास व मानधनावरील खर्चावर प्रश्न उपस्थित करीत, नाशिकमधील तज्ज्ञ, साहित्यिक आणि वक्त्यांना व्यासपीठावर स्थान का दिले जात नाही, असा सवाल केला. अध्यक्षांनी परदेशी वक्त्यांना केवळ इकॉनॉमी क्लासचे तिकीट दिले जाते, असे स्पष्टीकरण दिले; मात्र सभासदांचे समाधान झाले नाही.
सभागृहाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात होणार असून, स्थानिक चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनासह सीएसआर निधीतून १२ लाखांच्या एलईडी वॉलची उभारणी करण्यात येणार आहे.
यंदाच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या व्याख्यानाने होणार आहे. तसेच ३ मे रोजी ‘शिवानी रामतीर्थ गोदावरी समिती’ आणि ‘ब्रह्माकुमारी संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवानी दीदींचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, स्मृती व्याख्यानांच्या माध्यमातून कुटुंबांकडून मिळणाऱ्या देणग्यांचाही उल्लेख यावेळी करण्यात आला. हेमंत देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.






