मालेगाव : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत महसूल प्रशासनावर वाढलेला ताण लक्षात घेता सोयगाव येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय अर्थात ‘सजा’ मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या कॅम्प सजा अंतर्गत सोयगाव, द्याने, कॅम्प, भायगाव आणि काष्टी या भागातील सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्येचा भार केवळ एका तलाठी कार्यालयावर असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहे. राजू सूर्यवंशी, ताराचंद बच्छाव यांच्यासह अनेकांनी ही मागणी केली.






