वाचकांच्या प्रेमामुळेच ‘कार्व्हर’चे ‘सुवर्ण’पान!

Contributed byवैष्णवी राऊत|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वीणा गवाणकर लिखित 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाची ५०वी आवृत्ती प्रसिद्ध झाली. हे पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित झाले होते. सुरुवातीला मुलांसाठी लिहिलेले हे पुस्तक सर्व वयोगटांत लोकप्रिय ठरले. चार दशकांनंतरही या पुस्तकाची लोकप्रियता कायम आहे. वाचकांच्या प्रेमामुळेच हे यश मिळाले आहे. या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता.

वाचकांच्या प्रेमामुळेच ‘कार्व्हर’चे ‘सुवर्ण’पान!

मराठी साहित्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रेरणादायी ठरलेल्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाने नवा मैलाचा दगड पार केला आहे. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर लिखित या चरित्रग्रंथाची ५०वी आवृत्ती शनिवारी वसईत त्यांच्या राहत्या घरी प्रसिद्ध झाली. ‘कार्व्हर पुस्तकाच्या यशामागे निव्वळ वाचकांचे प्रेम आहे. त्यांच्यामुळेच हा ‘सुवर्ण’ टप्पा गाठणे शक्य झाले’ अशा भावना गवाणकर यांनी यावेळी मांडल्या.

अमेरिकी शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या संघर्षाची गाथा मांडणारे हे पुस्तक सन १९८१मध्ये प्रथम प्रकाशित झाले. सुरुवातीला केवळ मुलांसाठी लिहिलेले हे पुस्तक अल्पावधीतच सर्व वयोगटांतील वाचकांच्या पसंतीस उतरले. आज चार दशकांनंतरही या पुस्तकाची लोकप्रियता कायम आहे. वीणा गवाणकर यांच्या वसईतील राहत्या घरी शनिवारी राजहंस प्रकाशनाचे संपादक, तसेच सर्वेसर्वा दिलीप माजगावकर, संपादक डॉ. सदानंद बोरसे, कलादिग्दर्शक विकास गायतोंडे आणि चंद्रकांत गवाणकर, प्रसन्ना ठाकूर यांच्या उपस्थितीत या पुस्तकाच्या ५०व्या आवृत्तीचे प्रकाशन पार पडले.

‘श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’ या दिवाळी अंकात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यावर लिहिलेल्या हस्तलिखितापासून या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झाले, तेव्हा फार तर दोन आवृत्त्या येतील, असे वाटले होते. मात्र, दुसरी आवृत्ती येण्यापूर्वीच पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर कोणतीही जाहिरात न करता दरवर्षी नवनवीन आवृत्त्या येत गेल्या. या प्रवासातील १८वी आवृत्ती विशेष लक्षवेधी ठरली. ही पहिलीच ‘डिलक्स’ आवृत्ती होती. ती चाररंगी चित्रांनी सजलेली होती. सह्याद्री वाहिनीवर प्रकाशन सोहळा पालेले हे त्या काळातील पहिलेच पुस्तक होते. या पुस्तकाला वाचकांनी इतका उदंड प्रतिसाद दिला की, त्यांनी पाठवलेल्या पत्रांची एक पुस्तिका तयार करण्यात आली,’ अशा आठवणी गवाणकर यांनी जागवल्या. ‘हे पुस्तक कित्येक लोकांना अमेरिकेत वाचून दाखवताना पहिले आहे,’ असा अनुभव विकास गायतोंडे यांनी सांगितला.