अवैध सावकारीतून महिलेस धमक्या

महाराष्ट्र टाइम्स

निफाड शहरात एका महिला व्यावसायिकेचे अवैध सावकारीतून मोठे आर्थिक शोषण झाले. भाऊसाहेब बोरगुडे याने व्याजाने पैसे देऊन शिवीगाळ, धमक्या दिल्या. महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अवैध सावकारीचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

exploitation of a woman entrepreneur in niphad through illegal money lending

अवैध सावकारीच्या माध्यमातून निफाड शहरातील एका महिला व्यावसायिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून त्यांना शिवीगाळ, धमक्या देणे आणि बेकायदेशीर वसुली केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नैताळे (ता. निफाड) येथील भाऊसाहेब पंडित बोरगुडे याच्या विरोधात निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध खासगी सावकारीचे प्रकरण पुढे आले आहे.

याबाबत निफाडच्या गायत्रीनगर येथील ३६ वर्षीय महिलेने निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिला ही साडी विक्री व्यवसाय करते. व्यवसाय वाढविण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी भाऊसाहेब बोरगुडे याच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती. सुरुवातीला एक लाख रुपयांची गरज असताना संशयिताने दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यातून मोठी रक्कम व्याज व इतर कारणांखाली कापून घेतली. यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा दोन लाख रुपये उसने घेतले असता, संशयिताने मोठ्या प्रमाणात व्याज आकारले. फिर्यादीने व्याजासह सुमारे दोन लाख ६० हजार रुपये परत केल्यानंतरही संशयिनाने आणखी ६० हजार रुपयांची मागणी केली. तसेच वारंवार फोन करून अश्लील शिवीगाळ, दुकानात येऊन दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित महिलेने आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष उत्तम निर्भवणे यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती त्यांनी महिलेला धीर देत पोलिसांकडे पाठपुरावा केला होता.

याप्रकरणी संशयित बोरगुडेविरोधात निफाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.