सायाळेत पुन्हा बिबट्याची दहशत

महाराष्ट्र टाइम्स

सायाळे-चिंचोली मार्गावर बिबट्याचा वावर वाढला आहे. दुचाकीस्वारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दत्तू चासकर आणि हरी शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यापूर्वीही काही जण बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे चिंता वाढली आहे.

सायाळेत पुन्हा बिबट्याची दहशत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सायाळे-चिंचोली मार्गावर बिबट्याच्या हालचाली वाढल्याने दुचाकीस्वारांवर पाठोपाठ हल्ल्यांच्या घटना समोर आल्या असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या दोन दिवसांत दोन जणांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

दत्तू भागवत चासकर (वय ४०) हे शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सुमारे ७ वाजता मोटारसायकलवरून जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला लाथ मारून तेथून सुटका करून घेतली. मंगळवारी (दि. २१) हरी भास्कर शिंदे (२२) यांच्यावरही अशाच प्रकारे हल्ला झाला. मोटारसायकल वेगात असल्याने बिबट्याचा पंजा त्यांना लागला व त्यांची पॅन्ट फाटली; मात्र ते सुदैवाने बचावले. यापूर्वीही जगन कोंडाजी शिंदे (६५) व कृष्णा मोहन शिंदे (३०) हे बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बिबट्याचा वावर स्पष्ट होत आहे.