‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून केलेल्या शिवीगाळप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध राज्यभरात रोष निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. त्यांच्याविषयी गलिच्छ शब्दांचा वापर केला जात असल्याने बुलढाणा व मोताळा येथे शिवसैनिकांनी आमदार गायकवाड यांच्या प्रतिमांवर दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले. सोबतच गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने या विषयावर पडदा टाकण्याचे आवाहनही शिवसैनिकांनी केले आहे.
शिवसेनेचे बुलढाणा जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत म्हणाले, काही लोकांनी आमदार गायकवाड यांच्याविषयी गलिच्छ शब्दांचा वापर केला. त्याचा आम्ही निषेध करतो. गायकवाड यांनी बुलढाणा शहरात शिवजयंती सुरू केली. भारतातील पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले. संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. विविध महामानवांचे पुतळे उभारले आहेत. सर्वांना सोबत घेऊन त्यांचे कार्य सुरू आहे. मात्र, पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनावधानाने त्यांच्या तोंडातून काही अपशब्द निघाले. त्याबद्दल दिलगिरीही त्यांनी व्यक्त केली, असेही राजपूत म्हणाले.
‘वंचित’कडून पुस्तकाचे
सामूहिक वाचन
बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली झतिहास कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातून मांडला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याची सूचना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यानंतर बुलढाणा शहरातील संगम चौकात शनिवारी ‘वंचित’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. ‘आमदार संजय गायकवाड हे महाराष्ट्राचे जेम्सलेन आहेत’, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केली. जेम्सलेन याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साथीने लिहिलेल्या पुस्तकात राजमाता जिजाऊंचे चारित्र्यहनन केले होते. नंतर त्याने माफी मागितली. तशी आमदार गायकवाड यांनीदेखील प्रशांत आंबी यांची व त्यांच्या आई, पत्नीची माफी मागितली. माफी मागितल्याने झालेले चारित्र्यहनन परत येत नसते, हे गायकवाड यांनी लक्षात घ्यावे, असा टोलाही जाधव यांनी लगावला.






