नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार असून, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या स्वतंत्र बाजार समिती केल्या जाणार आहेत. त्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पणन संचालकांना पत्र पाठवले असून, नियमानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाचे कक्ष अधिकारी सुनील जावळे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजन प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. १७ एप्रिल २०२५ मधील निर्णयातील प्रमुख अटी व शर्तीची पूर्तता करून, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील तरतूदीनुसार नाशिक बाजार समितीचे विभाजन होणार आहे.






