शाळेच्या शुल्कवाढीवरून सिन्नरला पालकांत संताप

महाराष्ट्र टाइम्स

सिन्नर शहरातील होरायझन ॲकॅडमी शाळेने इयत्ता १ ली ते १० वीच्या वार्षिक शुल्कात ५० टक्के वाढ केली आहे. पालकांनी या दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला आहे. नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शाळेला भेट देऊन शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. पालक-शिक्षक संघाला विश्वासात न घेतल्याचा आरोप आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शाळेच्या शुल्कवाढीवरून सिन्नरला पालकांत संताप
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सिन्नर शहरातील होरायझन ॲकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या ५० टक्के फी वाढीवरून वाद चिघळला असून, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत सुमारे २१ हजार रुपये असलेली वार्षिक फी यंदा थेट ३० हजारांवर नेण्यात आली आहे. याविरोधात शनिवारी (दि. २५) नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शाळेला भेट देत फी वाढ तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला.

फी वाढ करताना पालक-शिक्षक संघ (पीटीए) ला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या नियमांनुसार फी वाढीपूर्वी पीटीएची बैठक घेणे व मान्यता घेणे आवश्यक असताना हा नियम धाब्यावर बसविल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या विरोधात पालकांनी पंचायत समितीत धाव घेत गटविकास अधिकारी अशोक भवारी व गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे यांना निवेदन दिले. गटशिक्षणाधिकारी डामसे यांनी हस्तक्षेप करत ५० टक्के फी वाढ नियमबाह्य असल्याचे नमूद करून शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.