‘ऑपरेशन लोटस’ ही बकासुराची भूक!

महाराष्ट्र टाइम्स

आम आदमी पक्षाचे खासदार भाजपमध्ये गेल्याने संजय राऊत यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसवर टीका केली. त्यांनी भाजपला बकासुर म्हटले. भाजपचे नेते नवनाथ बन यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले. राऊत दुर्योधन आणि दुःशासनासोबत असल्याचे ते म्हणाले. राघव चड्ढा पांडवांसोबत राहतील असा दावाही त्यांनी केला.

sanjay raut criticizes bjps operation lotus calling it bakasuras hunger

आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या ‘ ऑपरेशन लोटस ’ धोरणाला ‘निर्लज्ज’ आणि ‘बकासुराची भूक’ असे म्हणत शनिवारी टीका केली.

राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याबद्दल खासदार राऊत यांनी ही टिप्पणी केली. ‘भाजपची राजकारण करण्याची पद्धत आता जगजाहीर आहे. त्यांच्या या राजकारणाचे वर्णन करायचे झाले तर ‘निर्लज्ज’ हा एकच शब्द पुरेसा आहे. कालपर्यंत जे नेते भाजपला गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवत होते, त्यांनीच आता पक्षात प्रवेश केला आहे’, असे म्हणत त्यांनी भाजपमध्ये जाणाऱ्या ‘आप’ खासदारांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. यावेळी राऊत यांनी भाजपचा उल्लेख बकासुर असा केला. ‘जशी महाभारत काळातील बकासुराची भूक कधीच शांत होत नव्हती, तशीच अवस्था आज भाजपची झाली आहे. त्यांना समोर दिसेल ते खाऊन पोट भरायचे आहे’, असा खोचक टोला त्यांनी लगावला. दरम्यान, चड्ढा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर सात खासदारांमुळे विरोधी पक्षाच्या एकीला तडा जाणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.

‘भाजपचा उल्लेख बकासुर असा करणारे संजय राऊत हे दुर्योधनाबरोबर आहेत आणि ते स्वतः दु:शासनाच्या भूमिकेत आहेत. ते महाभारतातील दु:शासनाप्रमाणे वागत आहात. ज्यांचे नाव राघव आहे ते दुर्योधन आणि दु:शासनासोबत नव्हे, तर ते पांडवासोबतच राहतील. दु:शासन होऊन त्यांनी कशा पद्धतीने महिलांवर टीका केली ते एकदा जनतेला सांगावे’, अशा शब्दांत शनिवारी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.