राज्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून विजेच्या मागणीने गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी २६,७४४ मेगावॉटपर्यंत पोहोचली असून, यामुळे वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी या हंगामातील सर्वाधिक मागणीची नोंद झाली. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास विजेच्या वापरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः विदर्भ प्रांतात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. अतिभारामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होऊन निकामी होऊ नयेत, यासाठी एअर कुलर लावण्यात आले आहेत. वाढत्या मागणीमुळे पायाभूत सुविधांवर ताण येऊन अनेक भागात तांत्रिक बिघाड, ट्रिपिंग आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
शहरात पारा ४५ अंशांच्या पार जात असताना, दुसरीकडे सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागपूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिण्याचा त्रासदायक प्रकार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज एक ते दोन तास वीज खंडित होण्याचे सत्र सातत्याने सुरू असून, महावितरणच्या या कारभाराविरोधात आता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीत हे अघोषित लोडशेडिंग तर नाही ना, असादेखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
नागपूरचा उन्हाळा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या गरमीत कुलर्स आणि पंख्यांचा आधार असतो. मात्र, ऐन दुपारी किंवा रात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे हाल बेहाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला साधा सुरळीत वीजपुरवठा करता येत नाही का, असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. शहरातील अनेक भागांत कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. कुठे दुरुस्तीच्या नावाखाली तर कुठे तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन तासनतास बत्ती गुल असते. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गेल्याने नागरिकांची झोप उडत आहे. सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे. या काळात वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. सोशल मीडियावर देखील महावितरणच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. ‘आम्ही वीजबिल वेळेवर भरतो, मग आम्हाला ही अंधारयात्रा का सोसावी लागते’, अशी भावना व्यक्त होत आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेला विजेचा हा खेळ सोमवारी दिवसभर शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू होता. महाल परिसरात रविवारी ११.५० वाजता, मानेवाडा-बेसा रोड परिसरात मध्यरात्री १२.४० वाजता, जानकीनगरात मध्यरात्री १.३७ वाजता तर प्रतापनगरात सोमवारी सकाळी ७.३० वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती तेथील रहिवाशांनी ‘मटा’ला दिली.
याशिवाय, शहरातील इतर भागांतही विजेचे येणे-जाणे सुरू होते. अनेक भागांत नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन आपला निषेध नोंदवल्याचीदेखील माहिती आहे. दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे किंवा पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणाचे दावे केले जातात. प्रत्यक्षात, जमिनीवर परिस्थिती शून्य आहे. जुन्या झालेल्या केबल्स, ट्रान्सफॉर्मरवर येणारा अतिरिक्त ताण आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागपूरकरांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.
बापरे! सहा तासांहून
अधिक काळ...
दक्षिण नागपुरातील काही भागांत शनिवारी सलग सहा तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कडाक्याच्या उन्हात पंखे आणि कुलर बंद पडल्याने रहिवाशांचे हाल झाले. दक्षिण-पश्चिम नागपुरातील विविध वस्त्यांमध्येही वारंवार वीज जाणे आणि अल्पकाळासाठी वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती आहे.




