श्री काळारामाला आमरसाचे स्नान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मोहिनी एकादशीनिमित्त श्री काळाराम मंदिरात मूर्तींना पंचांमृत आणि आंब्याच्या रसाने स्नान घालण्यात आले. उन्हाळ्यामुळे सोवळे नेसवून केशर, चंदन आणि कापराची उटी लावण्यात आली. सातपूर येथे जनगणनेचे काम नको, अशी मागणी मनसे शिक्षक सेनेने केली आहे. सिडकोत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

श्री काळारामाला आमरसाचे स्नान

पंचवटी : वैशाख शुक्ल एकादशी तथा मोहिनी एकादशीनिमित्त सोमवारी श्रीकाळाराम मंदिरातील मूर्तींना पंचांमृत महाभिषेक व आब्याच्या रसाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर उन्हाळा असल्याने परंपरेनुसार फक्त सोवळे नेसवण्यात आले व त्यानंतर केशर, चंदन, कापूर उगाळून त्याची उटी लावण्यात आली. एकादशीनिमित्त काळाराम मंदिरात सकाळपासून भाविकांची वर्दळ होती.

‘जनगणनेचे काम नको’

सातपूर : मनसे शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सुरेश खांडबहाले व सरचिटणीस शिवाजी शिंदे यांनी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे व स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांची भेट घेऊन बीएलओ व पर्यवेक्षकांना जनगणनेचे आदेश देऊ नयेत, याबाबत निवेदन दिले. जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांचा आदेश असताना सुद्धा बीएलओ व पर्यवेक्षक यांना जनगणनेचे आदेश आलेले आहेत. यामुळे मनपा शिक्षक व इतर कर्मचारी द्विधा मन:स्थितीत असून कोणते काम करावे याबाबत संभ्रमात आहेत.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

सिडको : प्रभाग क्रमांक २४ मध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शिवसेना सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुधवारी (दि. २२) कालिका पार्क परिसरात एका महिलेवर श्वानाने हल्ला करून तिच्या पायाचा लचका तोडला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.