स्वगणनेत माहिती भरण्याचे आवाहन

महाराष्ट्र टाइम्स

जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणना प्रक्रिया १ मेपासून सुरू होत आहे. नागरिक १ ते १५ मे २०२६ पर्यंत se.census.gov.in या संकेतस्थळावर कुटुंबाची माहिती भरू शकतील. हे पोर्टल मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जे नागरिक स्वगणना करू शकणार नाहीत, त्यांची माहिती २३ एप्रिल ते ८ मे या काळात प्रगणक घरोघरी जाऊन संकलित करतील. नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.

census 2027 self enumeration process starts from may 1

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ जनगणना २०२७ ’ उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात स्वगणना प्रक्रिया १ मेपासून सुरू होणार आहे. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत https:// se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांनी आपल्या कुटुंबाची अचूक व संपूर्ण माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये हे पोर्टल उपलब्ध असून, सर्वसामान्यांसाठी सुलभ असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

अचूक आकडेवारीच्या आधारे सरकार विविध लोककल्याणकारी योजना तयार करून राबविते. यंदा प्रथमच डिजिटल माध्यमातून जनगणना करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःहून माहिती नोंदविता येणार आहे. जे नागरिक स्वगणना करू शकणार नाहीत त्यांची माहिती घरोघरी जाऊन संकलित करण्याचे काम प्रगणक व पर्यवेक्षकांनी २३ एप्रिलपासून सुरू केले आहे. हे काम ८ मेपर्यंत सुरू राहणार आहे. नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण २३ एप्रिल ते ८ मे या कालावधीत तालुकास्तरावर सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक ती अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.