शिवसेनेचा झेंडा फडकवा

महाराष्ट्र टाइम्स

शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक आणि धुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निहाय बूथवर बीएलएंच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले. संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर त्यांनी भर दिला. संपर्कमंत्री लवकरच जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.

शिवसेनेचा झेंडा फडकवा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आगामी काळात होणाऱ्या नाशिक व धुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांत शिवसेनेचा झेंडा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा दिंडोरी, धुळे लोकसभा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना केले. विधानसभा निहाय बूथवर शिवसेना पक्षाचे बीएलएंच्या नेमणुका तत्काळ करण्याचे निर्देशही चौधरी यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले.

संघटनात्मक बांधणी आणि एसआयआरच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी, धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार चौधरी यांच्याकडून दुसऱ्या टप्प्यात तालुकानिहाय बैठकांचा धडाका सुरू आहे. मतदारसंघातील सुरगाणा, कळवण, दिंडोरी, येवला, चांदवड आणि निफाड या नाशिक लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन तालुक्यातील विद्यमान संघटन रचना, बूथस्तरावरील कार्यपद्धती तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संघटन बळकटीसाठी बूथस्तरावरील कार्य अधिक प्रभावी करणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकपूर्व तयारी वेळेत पूर्ण करणे यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

नाशिकसह धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी महत्त्वाची असल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले. पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संपर्कमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. या संपर्कमंत्र्याकडूनही लवकरच जिल्ह्यात बैठका होणार असल्याचेही चौधरी यांनी विधानसभानिहाय बैठकांमध्ये स्पष्ट केले.