संघटन सृजनवर आज दिल्लीत बैठक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीत आज काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानावर बैठक होणार आहे. निरीक्षकांचे अहवाल आणि मते मांडली जातील. के. सी. वेणूगोपाल, शशिकांत सेंथिल, विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा होईल. कृषी विकास प्रतिष्ठानचा पहिला 'देवीलाल जयस्वाल भला माणूस पुरस्कार-२०२५' डॉ. विलास डांगरे यांना जाहीर झाला आहे. राजभाषा दिनानिमित्त १ मे रोजी कविसंमेलन आयोजित केले आहे.

संघटन सृजनवर आज दिल्लीत बैठक

नागपूर : अलीकडेच शहर व ग्रामीण काँग्रेसमध्ये संघटन सृजन अभियान राबविण्यात आले. यादरम्यान एआयसीसी तसेच प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी नोंदविलेली मते व त्यांचे अहवाल आज, मंगळवारी दिल्ली दरबारी मांडण्यात येतील. यात के. सी. वेणूगोपाल व शशिकांत सेंथिल यांची निरीक्षकांशी चर्चा होईल. याखेरीज प्रदेशाध्यक्ष तसेच काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांच्याशीही चर्चा केली जाईल. अखेर, या अहवालांमधील नावांवर निर्णय घेतला जाईल.

डॉ. डांगरेंना पुरस्कार

नागपूर : कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने यंदापासून ‘देवीलाल जयस्वाल भला माणूस पुरस्कार-२०२५’ प्रदान करण्यात येणार असून पहिला पुरस्कार पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांना जाहीर झाला आहे. उद्योजक देवीलाल जयस्वाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात चांगल्या पद्धतीने वागणाऱ्या भल्या माणसाला हा पुरस्कार देण्यात येईल. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिटणवीस सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

राजभाषादिन शुक्रवारी

नागपूर : मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त १ मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त, नंदनवन येथील जोतिबा माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे दुपारी ३ वाजता कविसंमेलन होणार आहे. कवी निरंजन मार्कंडेयवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनाचे उद्घाटन मुख्याध्यापक अरुणा कडू यांच्या हस्ते होईल. मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालक माधुरी अशिरगडे, साहित्यिक डॉ. राम बुटके, विजय मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.