संशयित अशोक खरात याच्या कुकर्मांसह मालमत्ता व आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास पोलिसांसह सक्तवसुली संचालनालय (ईडी) व आयकर विभाग करीत आहे. त्यातच खरातची पत्नी संशयित कल्पना हिच्या नावावर खरातच्या एकूण मालमत्तेपैकी चाळीस टक्के मालमत्ता आहे. यासह आठ वर्षांत सात कोटींचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आठ, खंडणीचे दोन, फसवणुकीचे सात व धमकावल्याचा एक असे अठरा गुन्हे नाशिक शहर, सिन्नर, शिर्डी, राहkता, ठाणे येथील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी विशेष तपास पथकाकडे अत्याचाराचे आठ व फसवणुकीचा एक अशा गुन्ह्यांचा तपास आहे. त्यापैकी अत्याचाराच्या सातव्या गुन्ह्यात त्याला सोमवारी (दि. २७) ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक अभियोक्ता शैलेन्द्र बागडे यांनी युक्तिवाद केला. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी तपासातील मुद्दे स्पष्ट केले. त्यानुसार न्यायालयाने खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पती-पत्नीमधील वाद सोडवल्यामुळे पीडितेचा खरातवर विश्वास बसला होता. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान खरातने कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात पीडितेला गुंगीकारक पदार्थ देत मुलांच्या जीवाचे भय दाखवून चार वेळा अत्याचार केला. खरातच्या अटकेनंतर पीडितेने पतीच्या पाठिंब्याने धाडस करून फिर्याद दाखल केली होती. त्या प्रकरणात आता ‘एसआयटी’ खरातची चौकशी करीत आहे.
शिर्डी येथील चार एकर जमीन खरेदी व खासगी सावकारीच्या गुन्ह्यात संशयित कल्पना खरात पसार आहे. त्या जमिनीच्या व्यवहारावेळी कल्पना स्वतः दुय्यम निबंधक कार्यालयात हजर होती. तिने स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे दिले होते. त्या व्यवहारातून कल्पनाच्या बँक खात्यात ५१ लाख रुपये ‘टोकन’ जमा झाले होते. गोविंदनगर येथील तिच्या एका बँक खात्यात सन २०१९ पासून सात कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत. खरातच्या मालमत्तेपैकी चाळीस टक्के मालमत्ता कल्पनाच्या नावावर आहे. त्याचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे. त्यानुसार न्यायालयानेही सात कोटींसारखा मोठा व्यवहार बँक खात्यात होत असताना कल्पनाला त्याबद्दल माहीत नव्हते, हे पटण्यासारखे नाही, असे निरीक्षण नोंदवले होते.




