धर्मांतरासाठी पीडितेचे नाव बदलले!

महाराष्ट्र टाइम्स

एका बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात संशयित निदा एजाज खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज पुन्हा रखडला आहे. धर्मांतरासाठी पीडितेचे नाव बदलून तिला मलेशियात पाठवण्याचा डाव होता, असे न्यायालयात सांगण्यात आले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला असून, २ मे रोजी निदाच्या जामीनावर न्यायालय निर्णय देणार आहे.

धर्मांतरासाठी पीडितेचे नाव बदलले!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बहुराष्ट्रीय कंपनीत अविवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार , विनयभंग आणि तिच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याच्या गुन्ह्यातील संशयित निदा एजाज खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज पुन्हा रखडल्याने तिच्या अडचणींत वाढ झाली आहे. या गंभीर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे आता विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी न्यायालयात तब्बल चार तास युक्तिवाद केला. त्यानुसार निदाच्या अटकपूर्व जामीनाबाबत २ मे रोजी न्यायालय ‘ऑर्डर’ देणार आहे. तर धर्मांतरासाठी पीडितेचे नाव बदलून तिला मलेशियात पाठविण्याचा डाव होता, हे न्यायालयात सांगण्यात आले.

देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल अत्याचार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्ह्यातील पसार संशयित निदा एजाज खान हिचा नाशिकरोड येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल आहे. त्यावर २० एप्रिल रोजी पहिल्यांदा सुनावणी झाली होती. निदा ही तीन महिन्यांची गर्भवती असून, ‘एसआयटी’ने मुंब्रात तिच्या पतीचा जबाब नोंदवला होता. पहिल्या सुनावणीवेळी चाळीस मिनिटांच्या युक्तिवादानंतर सरकारी वकील आणि पीडितेचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल. तोपर्यंत निदा हिला अंतरिम दिलासा (अटकेपासून संरक्षण) नसेल, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार २७ एप्रिल रोजी पुन्हा न्यायकक्षात सुनावणी झाली. त्यावेळी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारी पक्षातर्फे तर पीडितेच्या बाजूने वकील मिलिंद कुरकुटे यांनी युक्तिवाद केला. तर निदाच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली. भारतात धर्मांतरासंबंधी कोणताही कायदा नाही. त्यामुळे एखाद्यावर तसा आरोप कसा लावला जाऊ शकतो, असा दावा कासलीवाल यांनी केला. त्यावर धर्मांतराबाबत कोणताही कायदा नसला तरी, कलम २९९ चा वापर केला जाऊ शकतो, असे मिसर यांनी सांगितले.

दरम्यान, कंपनीतील विवाहित तरुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात संशयित तौसिफ बिलाल अत्तार (वय ३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) व रझा रफीक मेमन (३५) हे सर्वजण ‘एसआयटी’च्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी विशिष्ट धर्माची टोपी पीडिताला परिधान करून त्याचे फोटो, व्हिडीओ एका विशिष्ट व्हॉटसॲप ग्रुपवर शेअर केले होते. यासह कंपनीतील प्रकरणांबाबत आठ गुन्हे नोंद आहेत. संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हे नाशिकरोड कारागृहात आहेत. तर, संशयित निदा खान ही पसार असून गर्भवती असूनही तिच्यावरील गंभीर आरोपांमुळे न्यायालयाने तिला अद्याप अटकेपासून संरक्षण दिलेले नाही.

तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नाच्या संशयित दानिश शेख याने अटकपूर्व जामीनासाठी २१ एप्रिल रोजी अर्ज केला होता. त्या दिवशी न्यायालयाने फिर्यादीमधील तपशिलानुसार संशयिताने पीडिताच्या धर्मासह श्रद्धेचा अपमान करून त्याच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक व द्वेषपूर्ण हे कृत्य केल्याचे दिसते. त्यामुळे पीडिताच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले होते. यासह दानिश याला अंतरिम जामिनापासून संरक्षण दिलेले नव्हते. त्यामुळे २५ एप्रिल रोजी ‘एसआयटी’ने दानिशसह इतरांना त्या गुन्ह्यात अटक केली. त्यानुसार सोमवारी दानिशच्या अर्जावर सुनावणी होती. तत्पूर्वीच अटक झाल्याने सदरचा अर्ज ‘निकाली’ काढण्यात आला.