सर्व खासगी हॉस्पिटल्सनी रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नाशिकमध्ये केले.
‘कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएसआय) महाराष्ट्र शाखेच्या वतीने हृदयविकारतज्ज्ञांसाठी आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्याला आबिटकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर हृदयविकारतज्ज्ञ संघटनेचे डॉ. गौरव वर्मा, डॉ. विजय बंग, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. आशिष देशपांडे, आयोजन समितीचे सचिव डॉ. मनोज चोपडा आदी उपस्थित होते. रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये २४ ते २६ एप्रिल या कालावधीत ही परिषद पार पडली. त्यामध्ये हृदयविकार क्षेत्रातील नवनवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतींची देवाणघेवाण करण्यात आली. यावेळी आबिटकर म्हणाले, ‘सरकार आणि खासगी डॉक्टर्समध्ये समन्वय गरजेचा आहे. महाराष्ट्राचे आरोग्य राखण्यात हृदयविकारतज्ज्ञांचे योगदान मोलाचे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, ईएसआयसी यांसारख्या योजनांमध्ये सर्व हॉस्पिटल्सनी सहभागी व्हावे, असे आवाहन आबिटकर यांनी केले. डॉ. चोपडा यांनी परिषदेच्या उद्देशाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक उपचार आता महाराष्ट्रातही तुलनेत कमी खर्चात शक्य होत असल्याचे डॉ. वर्मा यावेळी म्हणाले. हृदयविकारांवरील उपचारांत महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. बंग यांनी काढले. डॉ. आशिष देशपांडे यांनी आभार मानले. हृदयविकारतज्ज्ञांनी १८० केसेस यावेळी सादर केल्या.




