अनिल अंबानी यांच्या मुंबईतील फ्लॅटवर टाच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील फ्लॅटवर आणि त्यांचे पुत्र जय अंशुल अंबानी यांच्या खंडाळा येथील फार्महाउसवर टाच आणली आहे. रिलायन्स कम्युनिकेशनच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ३,०३४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ही टाच आणली गेली आहे. काही मालमत्ता कोकिळाबेन धीरुबाई अंबानी यांच्या नावावर आहेत.

anil ambani faces action 3034 crore seizure in money laundering case

रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) विरोधात बँक फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या तपासांतर्गत ३,०३४ कोटी रुपयांच्या टाच कारवाईअंतर्गत उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुंबईतील फ्लॅट आणि त्यांचे पुत्र जय अंशुल अंबानी यांची संयुक्त मालकी असलेल्या खंडाळा येथील फार्महाउसवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली.

‘मालमत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि बँका व जनहिताचे रक्षण करण्यासाठी, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तात्पुरती टाच आणली आहे,’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. आरकॉम रिलायन्स ही अनिल अंबानी समूहाची (आरएएजी) कंपनी आहे. ‘टाच आणलेली काही मालमत्ता अनिल अंबानी यांची आई कोकिळाबेन धीरुबाई अंबानी यांची आहे,’ असे प्रवक्त्यांनी सांगितले.