पुणे शहर आणि उपनगरात वाढणाऱ्या अमली पदार्थांना चाप लावण्यासाठी ‘परिमंडळ ७’मध्ये विशेष मोहीम राबवून महिनाभरात पोलिसांनी १९ आरोपींना अटक केली. आरोपींकडून ५८ लाख रुपये किमतीचे २८९ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) ४२२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने शहरात अमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार ‘परिमंडळ ७’चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी मोहीम सुरू केली. वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ, चंदननगर आणि खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा, एम. डी. यांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर ‘एनडीपीएस’अंतर्गत १३ गुन्हे दाखल करून १३ आरोपींना अटक करण्यात आली. यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला.
प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. वडगाव शेरी), उबेद अन्सार खान (वय २७, रा. हडपसर), व्यंकटेश गंगाप्पा चव्हाण (वय १९), सार्थक बलराज खंडागळे (१९), अमित अपधेश यादव (२३, वडगाव शेरी), सुमीत संजय लांडगे (२५, रा. रामवाडी), प्रवीण पूनम राम बिष्णोई (२२, रा. कात्रज), योगेश सुभाष कनगरे (२८, रा. संभाजीनगर), नीलेश सदाशिव भोसले (३६, रा. चऱ्होली), मानविंद्र शंकर सिंह (४२, रा. टिंगरेनगर), रमेश उदाराम सुतार (३४, रा. लोहगाव), पुंजाजी जयचंद्र चौधरी (३०, रा. वाघोली), भगीरथ सज्जनसिंह राजपुरोहित (२८, रा. राजस्थान) आणि आदिनाथ दशरथ शिर्के (२९, रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून काही अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केल्यावर राजस्थानातून एम डी विकत घेतल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी विशेष तपास पथक राजस्थानला रवाना केले. पुणे पोलिसांनी राजस्थानात जाऊन सहा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. यात एकूण ५८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
२३ दिवस ठेवली पाळत
मोबाइल क्रमांकाशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून पुण्यात ड्रगचे जाळे कार्यरत असल्याचा हा प्रकार आहे. पेडलर आणि ग्राहक यांचा थेट संपर्क असल्याने हे जाळे अधिक गुप्तपणे चालत होते. मात्र, पोलिसांनी २३ दिवस सतत पाळत ठेवून आणि तांत्रिक तपासानंतर रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईनंतर तपासाची व्याप्ती राजस्थानपर्यंत पोहोचली असून, तेथे मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्याचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईपूर्वी शहरातील सर्व पेडलर आणि ग्राहकांवर बारकाईने नजर ठेवली होती. ड्रगपुरवठा कुठून होतो, वितरणाची साखळी कशी कार्यरत आहे, याचा अभ्यास करून पोलिसांनी नियोजनपूर्वक कारवाई करून नेटवर्क उद्ध्वस्त केले.






