विमान सेवा जमिनीवर?

महाराष्ट्र टाइम्स

इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे जेट इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे भारतीय विमान कंपन्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने सरकारला इंधनाच्या दरात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरवाढीमुळे उड्डाणे रद्द होण्याची, भाडे वाढण्याची आणि वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो.

are airlines in danger airlines under pressure due to rising fuel prices

अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर चिघळलेल्या युद्धसंकटामुळे जेट इंधनांच्या किमती वाढतच चालल्याने देशातील विमान कंपन्यांपुढील ताण वाढला आहे. परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर विमानसेवा विस्कळीत होण्याचा धोका असून, प्रसंगी ती पूर्णपणे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहे, असा इशारा फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) दिला आहे. सरकारने इंधनाच्या किमतींत हस्तक्षेप करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

‘एफआयए’ ही संघटना एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून चिंता मांडल्या आहेत. ‘विमान इंधनाच्या किमती अनिश्चित झाल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. देशातील विमानसेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी या बेभरंवशाच्या किमतींबाबत तातडीने मदतीची आवश्यकता आहे,’ असे या संघटनेने म्हटले आहे. एटीएफच्या मनमानी दरवाढीमुळे उड्डाणे रद्द होतील, कनेक्टिव्हिटी कमी होऊन भाडे वाढू शकते आणि उड्डाणांचे वेळापत्रक अस्थिर होऊन कोलमडू शकते, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.