वाळणाऱ्या कपड्यावरून वादातून कोयत्याने हल्ला

महाराष्ट्र टाइम्स

भिगवणमध्ये कपड्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. आरोपींनी पीडित व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. या प्रकरणी पती-पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस तपास करत आहेत. पीडित व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

attack with sword over drying clothes in bhigwan serious injury

वाळत असलेल्या कपड्याचे पाणी अंगावर पडल्यामुळे जातिवाचक शिवीगाळ होऊन झालेल्या वादात एकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पती-पत्नीसह इतर दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडला.

गणेश उर्फ धनाजी जमदाडे (रा. मंगलदृष्टी अपार्टमेंट, भिगवण) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विक्रम बाळासो माडगे, त्याची पत्नी रूपाली माडगे (दोघे रा. मंगलदृष्टी अपार्टमेंट, भिगवण) आणि दोन अज्ञात व्यक्ती अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा यश धनाजी जमदाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी फरारी

जखमी जमदाडेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवले. आरोपी फरारी आहेत. बारामतीचे उपउभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तपास करीत आहेत.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माडगे व जखमी जमदाडे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. गॅलरीत वाळत असलेल्या कपड्याचे पाणी अंगावर सांडल्याने जमदाडे व माडगे यांच्यात वादावादी व शिवीगाळ झाली. यात विक्रम माडगे याची पत्नी म्हणाली, ‘जमदाडेला माज आल्यामुळे त्याला जीवे मारूनच टाका. तुम्ही काही काळजी करू नका, कितीही पैसे जाऊ दे. मी तुम्हाला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढते.’ यावर विक्रम याच्यासह दोघा जणांनी लोखंडी कोयत्याने जमदाडेंवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले.