अमेरिकेने युद्ध संपवले आणि इराणी बंदरांवरील नाकाबंदी उठवली तर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करू, असा प्रस्ताव इराणने पाकिस्तानमार्फत दिला होता. मात्र, ट्रम्प प्रशासन हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता नसल्याचे मंगळवारी दिसून आले.
इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने चर्चा केली असून, त्यावर ट्रम्प नंतर भाष्य करतील, असे व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आले. मात्र, हा प्रस्ताव अमेरिकेकडून फेटाळला जाण्याची शक्यताच जास्त असल्याचे दिसते. कारण, ‘इराणला अण्वस्त्रांपासून रोखणे हाच मूळ मुद्दा आहे’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
‘रशिया भेट यशस्वी’
मॉस्को : ‘रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी झालेली भेट यशस्वी ठरली. रशिया आणि इराण यांच्यातील सहकार्य विस्तारत आहे. रशियाने दाखवलेल्या पाठिंब्याचे स्वागत आहे’, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.






