शिळफाट्यानजीक कंटेनरने ट्रकला धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंटेनरच्या धडकेने ट्रकमधील रंगांचे डबे रस्त्यावर सांडले. अपघातात वाहनचालकांना किरकोळ दुखापत झाली.
भोलेनाथनगर येथे ठाण्याकडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर कंटेनरचालक मोहम्मद मुमताज याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या कंटेनरने थेट पुढील एका ट्रकला धडक दिली. या ट्रकमध्ये सहा टन रंगाचे डबे होते. तसेच कंटेनरमध्ये सात कार असल्याने ट्रकला जोरदार धडक बसून त्यातील रंगाचे डबे रस्त्यावर कोसळले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रंग रस्त्यावर पसरला. ट्रक भिवंडी येथून खोपोलीकडे जात होता. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिळ-डायघर पोलिस अधिकारी व कर्मचारी, वाहतूक पोलिस कर्मचारी क्रेन मशीनसह दाखल झाले. तसेच शिळ अग्निशमन केंद्राचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.






