समितीच्या उत्पन्नात घट

Contributed byसभापती|महाराष्ट्र टाइम्स

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कांदा, बटाटा आणि भाजीपाला विभागातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. बाजार शुल्क, स्थावर उत्पन्न आणि गुंतवणुकीवरील व्याजातही घट झाली आहे. मात्र, गूळ, भुसार आणि फळ विभागातून उत्पन्न वाढले आहे. एकूण उत्पन्नात पाच कोटींहून अधिक रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

समितीच्या उत्पन्नात घट
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कांदा-बटाटा आणि लसणाच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याचा फटका पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नाला बसला आहे. पुणे कृषी उत्पन् न बाजार समितीच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्नात पाच कोटी ४४ लाख २८ हजार १९७ रुपयांची घट झाली आहे. गेल्या काही वर्षांत दर वाढले नाहीत, त्यामुळे कांदा-बटाटा आणि भाजीपाला विभागाचे उत्पन्नात घटल्याचा दावा प्रशासनाने केला.

बाजार समितीच्या कांदा-बटाटा विभागातील उत्पन्नात मोठी घट झाली आहे. भाजीपाला विभागातील उत्पन्नातही घट झाली आहे. बाजार शुल्क, स्थावर उत्पन्न, खडकी बाजार, मांजरी बाजार आणि अन्य उत्पन्नातही काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे एकूण उत्पन्न घटले. मात्र, गूळ-भुसार व फळ विभागातील उत्पनात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सोमवारी दिली. सभापती प्रकाश जगताप, माजी उपसभापती शशिकांत गायकवाड, सहसचिव घनश्याम जेधे या वेळी उपस्थित होते.

कांदा-बटाटा विभागात सर्वाधिक सहा कोटी २४ लाख २९ हजार रुपयांची घट झाली आहे. बाजार शुल्कात चार कोटी २२ लाख १२ हजार १८९ रुपये, स्थावर उत्पन्नात नऊ लाख ७० हजार रुपये, गुंतवणुकीवरील व्याजात एक कोटी १३ लाख ७७ हजार ७५४ रुपये, इतर उत्पन्नात तीन लाख ६८ हजार ४३४ रुपये, जनावरांच्या बाजारात ५९ हजार ९८५ रुपये, मांजरी बाजारात ४१ लाख तीन हजार ६४९ रुपये, खडकी बाजारात तीन लाख ८४ हजार ५५४ रुपये, तर उत्तमनगर येथील बाजाराच्या उत्पन्नात नऊ हजार ५०६ रुपयांची घट झाल्याचे धोंडकर यांनी सांगितले.