पुणे : ‘ शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी नोटीस ॲड. असीम सरोदे यांनी कोल्हापूर पोलिसांना दिली आहे. आमदार गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही सरोदे यांनी दिला.
गायकवाड यांच्याविरुद्ध प्रकाशक आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. त्यावर सरोदेंनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली.
‘पोलिस स्वतः न्यायाधीश होऊन गुन्ह्याचे प्रकार ठरवित आहेत. या पूर्वी छोट्या गुन्ह्यांमध्ये दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. मग गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी देऊनही दखलपात्र गुन्हा का दाखल होत नाही,’ असा प्रश्न सरोदे यांनी केला.
‘मागील तीन दिवसांत ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या दहा हजार प्रती खपलेल्या आहेत. त्यामुळे गायकवाड यांना प्रकाशकांनी ‘रॉयल्टी’ द्यावी, असा टोलाही सरोदे यांनी लगावला.






