लेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधला जातो. सक्षम समाजनिर्मिती आणि बलशाली राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीत शारीरिक शिक्षणाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण हा केवळ पूरक विषय नसून राष्ट्राच्या प्रगतीशी निगडित घटक आहे.
मात्र, वास्तवात या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांसमोर गंभीर समस्या उभ्या ठाकल्या आहेत. राज्यात गेल्या जवळपास वीस वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदभरती अत्यंत कमी प्रमाणात झाल्यामुळे हजारो बी.पी.एड. आणि एम.पी.एड. पदवीधर बेरोजगार आहेत.
राज्य सरकारकडून दोन दशकांपासून शारीरिक शिक्षण शिक्षक भरती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २०२५ मध्ये ४८६० पदे जाहीर झाली आहेत, पण २०२५ च्या पदभरतीची भरती प्रक्रिया होणे बाकी आहे. म्हणूनच शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्यात यावे अशी युवकांची मागणी आहे. शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने बी.पी.एड व एम.पी.एड झालेल्या तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रावर भर देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडा या विषयांसाठी स्वतंत्र शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्याची आवश्यकता आहे. शालेय शिक्षण विभागाच्या १५ मार्च २०२४च्या निर्णयानुसार, २५१ ते ७५० विद्यार्थी संख्येसाठी एक, ७५१ ते १२५० विद्यार्थी संख्येसाठी दोन, १२५१ ते १५०० विद्यार्थी संख्येला तीन शारीरिक शिक्षण शिक्षक मंजूर आहेत. याशिवाय, शिक्षण विभागाने जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी क्रीडा शिक्षकांची ४ हजार ८६० पदे मंजूर केली असून, या अंतर्गत केंद्र शाळेत एक शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी या दीर्घकालीन मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने अखेर थेट लढाईचा बिगुल फुंकला असून सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदान, मंत्रालय परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारी निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांच्या १०० टक्के जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात याव्यात, रिक्त पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन करू नये, पवित्र पोर्टल टेट २०२५ भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा प्रमुख मागण्या महासंघातर्फे करण्यात आल्या आहेत.
राज्यभरातून मोठ्या संख्येने शारीरिक शिक्षण शिक्षक सहभागी झाले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील या महत्त्वाच्या विषयाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. सध्या देशभरात शालेय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात शारीरिक शिक्षण आणि ते देणाऱ्या शिक्षकांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे वास्तव दिसून येते. या आंदोलनाच्या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे.
एकीकडे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी पदके जिंकली की त्यांचा गौरव केला जातो, त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातो; परंतु त्या खेळाडूंची जडणघडण ज्या शालेय स्तरावर होते, त्या पातळीवर आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करून देण्याकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नाही. अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने नाहीत, तर काही ठिकाणी प्रशिक्षित शारीरिक शिक्षण शिक्षकच उपलब्ध नाहीत. जिथे शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत, तिथेही विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्यांची संख्या अपुरी ठरते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. शारीरिक शिक्षण, क्रीडा, योग आणि फिटनेस हे अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग मानले गेले आहेत. मात्र, शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या अभावामुळे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. म्हणूनच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियमित व मोठ्या प्रमाणावर भरती करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सर्वांगीण शिक्षण ही संकल्पना केवळ कागदावरच राहील.
शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पुढील पिढीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे होय. सुदृढ, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडवण्यासाठी शालेय स्तरावर शारीरिक शिक्षणाला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. सुदृढ आणि सक्षम भारत घडवायचा असेल, तर शालेय स्तरावर शारीरिक शिक्षणाला प्राधान्य देणे आणि त्यासाठी प्रशिक्षित शारीरिक शिक्षण शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती करणे अत्यावश्यक आहे. हेच या आंदोलनामागील मूळ तत्व आहे. शारीरिक शिक्षण शिक्षक भरती ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्राच्या आरोग्यदायी भविष्याची गरज आहे हे निश्चित.
(लेखिका सेंट मीरा महाविद्यालय, पुणे येथे उपप्राचार्य व शारीरिक शिक्षण शिक्षिका आहेत.)






