अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही भाऊ-बहिणीकडून मजुरी करून घेतल्याचा, तसेच कामादरम्यान अपघात झाल्यानंतर मुलाच्या उपचारांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर प्रकार गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विभुती गायकवाड, रा. एसडीपीएल आश्रय अपार्टमेंट, दाभा, नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षीय मुलाने पैशांची गरज असल्याने मार्च २०२५मध्ये फ्लेक्स बॅनरचे काम करणाऱ्या गायकवाड यांच्याकडे काम मागितले होते. मुलाने आपले वय आणि ओळखपत्राची माहिती दिल्यानंतरही त्याला महिन्याला सात हजार रुपयांवर कामावर ठेवण्यात आले. १८ जून २०२६ रोजी दिवाणी येथे होर्डिंग लावताना त्याला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढण्यास सांगण्यात आले. यावेळी होर्डिंग स्ट्रीट लाइटच्या तारांवर पडल्याने मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचे दोन्ही हात आणि पोट भाजले.अपघातानंतर आरोपीने मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, उपचार पूर्ण होण्यापूर्वीच त्याला घरी आणल्याचा आरोप आहे. पुढील उपचारांची मागणी केली असता मुलगा आणि त्याच्या १५ वर्षीय बहिणीला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. चाइल्डलाइनच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही भावंडांची सुटका केली. त्यानंतर त्यांना पाटणकर चौक येथील शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले.