प्रज्ञानंदचे उपविजेतेपदावर समाधान

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
प्रज्ञानंदचे उपविजेतेपदावर समाधान
भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंदला सिंक्वेफिल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याची सेंट लुईस (अमेरिका) येथे झालेल्या या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली. त्यानंतर त्याला बुधवारी रात्री विजेतेपदासाठी झालेल्या प्ले-ऑफ लढतीतील आर्मेगेडॉन डावात हार पत्करावी लागली. या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या वेस्ली याने विजेतेपद जिंकले.

प्रज्ञानंद उपविजेतेपद जिंकण्यापूर्वीच ग्रँड चेस टूर मालिकेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरला होता. ही स्पर्धा शनिवारी (ता. २२ ऑगस्ट) सुरू होईल. या स्पर्धेत प्राग, वेस्ली सो , फॅबिआनो कॅरुआना आणि व्हिन्सेंट केमर यांच्यात चुरस असेल. प्राग आणि कॅरुआना गत वर्षी साओ पावलो येथे झालेल्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरले होते. सिंक्वेफिल्ड कप स्पर्धेत अखेरच्या फेरीपूर्वी प्राग आणि वेस्ली सो संयुक्तपणे आघाडीवर होते. सो याची जागतिक आव्हानवीर - सिंदारोव याच्याविरुद्धची, तर प्रागची अनिश गिरीविरुद्धची लढत बरोबरीत सुटली. प्राग आणि गिरी यांच्यातील लढत निमझो इंडियन बचावात्मक पद्धतीने झाली. दोघांनीही विजयासाठी फारसे प्रयत्न न करता ३७ चालींनंतर गुण वाटून घेतला.
बरोबरीची ही मालिका रॅपिड लढतीतही कायम राहिली. वेस्ली सो याच्या तिसऱ्या फेरीतील विजयानंतरच्या सर्व लढती बरोबरीत सुटल्या. तो स्पर्धेतील बारा डावांत अपराजित राहिला. प्ले-ऑफच्या पहिल्या डावात प्रागची काळे मोहरे होती. वेस्ली सोने क्वीन्स गॅम्बिट डिक्लाईन्ड प्रकारातील शार्प लाइन वापरली. वेस्लीने जणू माझ्या अभ्यासाची परीक्षा घेतली. मात्र हा डाव बरोबरीत सुटणार हे सुरुवातीच्या चालीतच माझ्या लक्षात आले होते,' या प्रागच्या टिपणीने या डावात अपेक्षित चालीच झाल्या हे अधोरेखित होते. दुसऱ्या डावातही फारसे काही वेगळे घडले नाही. इटालियन ओपनिंग पद्धतीने झालेल्या या डावात प्रागच्या काही चाली फसव्या होत्या. मात्र वेस्लीने मोहऱ्यांची हुशारीने अदलाबदली केली. ती स्वीकारण्याशिवाय प्रागकडे पर्याय नसल्यामुळे डाव बरोबरीत सुटला. आर्मेगेडॉन डावाच्यावेळी प्रागकडे पांढरे मोहरे होती. त्यामुळे त्याच्यासाठी विजय आवश्यक होता. किंबहुना वेस्लीने हे जाणूनच रॅपिड डाव बरोबरीत सुटतील हे पाहिले होते. काळे मोहरे असलेल्या वेस्लीला जिंकण्यासाठी बरोबरी पुरेशी होती. ते त्याने साध्य केले. वेस्लीला कोंडीत पकडण्यात मला जवळपास यश आले होते. मात्र संधी साधू शकलो नाही,' अशी खंत प्रागने व्यक्त केली. त्यातच या डावात चालीसाठी अतिरिक्त दोन-तीन सेकंद वेळही फटका देतो. त्यामुळे प्रागला नेमका मार्ग शोधता आला नाही. `प्रत्येक स्पर्धा जिंकता येत नाही,' असे म्हणत वेस्लीने प्रागला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

दिव्या देशमुखला केर्न्स कप बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोनेरू हम्पी आठवी आली. जागतिक विजेतेपद लढतीसाठी पात्र ठरलेली वैशाली अखेरच्या फेरीतील पराभवामुळे अखेरच्या क्रमांकावर राहिली. पांढरे मोहरे असलेल्या दिव्याला अॅना मुझिचुकविरुद्ध ४१ चालीनंतर गुण वाटून घेणे भाग पडले. नऊ फेऱ्यांत दोन विजय, पाच बरोबरी आणि दोन पराभव या कामगिरीसह दिव्याने ४.५ गुण मिळवले. हम्पी आणि वैशालीने एकही लढत जिंकली नाही.