प्रज्ञानंदचे उपविजेतेपदावर समाधान

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

निर्णायक डावात विजयापासून दूर राहिल्याने दुसरा

प्रज्ञानंदचे उपविजेतेपदावर समाधान
रमेशबाबू प्रज्ञानंदला सिंक्वेफिल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याची सेंट लुईस (अमेरिका) येथे झालेल्या या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली. त्याला बुधवारी रात्री विजेतेपदासाठी झालेल्या प्ले-ऑफ लढतीतील आर्मेगेडॉन डावात हार पत्करावी लागली.

अखेरच्या फेरीपूर्वी प्राग आणि वेस्ली सो संयुक्तपणे आघाडीवर होते. सो याची जागतिक आव्हानवीर - सिंदारोव याच्याविरुद्धची, तर प्रागची अनिश गिरीविरुद्धची लढत बरोबरीत सुटली. प्राग आणि गिरी यांच्यातील लढत निमझो इंडियन बचावात्मक पद्धतीने झाली. दोघांनीही विजयासाठी फारसे प्रयत्न न करता ३७ चालींनंतर गुण वाटून घेतला.
बरोबरीची ही मालिका रॅपिड लढतीतही कायम राहिली. पहिल्या डावात प्रागची काळे मोहरे होती. वेस्लीने क्वीन्स गॅम्बिट डिक्लाईन्ड प्रकारातील शार्प लाइन वापरली आणि डाव अपेक्षेनुसार बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावातही फारसे काही वेगळे घडले नाही. इटालियन ओपनिंग पद्धतीने झालेल्या या डावात प्रागच्या काही चाली फसव्या होत्या. मात्र वेस्लीने मोहऱ्यांची हुशारीने अदलाबदली केली. ती स्वीकारण्याशिवाय प्रागकडे पर्याय नसल्यामुळे डाव बरोबरीत सुटला.

आर्मेगेडॉन डावाच्यावेळी प्रागकडे पांढरे मोहरे होती. त्यामुळे त्याच्यासाठी विजय आवश्यक होता. `वेस्लीला कोंडीत पकडण्यात मला जवळपास यश आले होते. मात्र संधी साधू शकलो नाही,' अशी खंत प्रागने व्यक्त केली. प्रागला त्याला खेळाची वेळेशी पुरती सांगड घालता आली नाही. चालीसाठी अतिरिक्त दोन सेकंद वेळही फटका देतो. `प्रत्येक स्पर्धा जिंकता येत नाही,' असे म्हणत वेस्लीने प्रागला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जेतेपद आवाक्यात आहे असे वाटत असताना दुरावल्यास जास्त दुःख होते, अशी टिपणी प्रागने केली.