Kuldeep Yadav Vs Saransh Jain Who Will Get The Chance In The Second Test
कुलदीपऐवजी सारांश जैनला संधी?
Contributed by: नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑफ-स्पिनर सारांश जैन आणि रिस्ट-स्पिनर कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला निवडायचे, हा भारताचा निर्णय पूर्णपणे सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल,’ असे मत श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रसेल अर्नाल्ड यांनी व्यक्त केले; त्याचबरोबर, शुक्रवारी होणाऱ्या सराव सत्रादरम्यान खेळपट्टी पाहिल्यानंतरच भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीपच्या जागी जैनचा समावेश करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असा सल्लाही अर्नाल्ड यांनी दिला.
भारताने गॉल येथील पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकली. यात मानव सुतारने दहा, तर रवींद्र जाडेजाने चार विकेट घेतल्या. मात्र, कुलदीपला एकच विकेट मिळाली.पहिल्या डावात त्याने १४ षटकांत ६५ धावा दिल्या, तर दुसऱ्या डावात ११ षटकांत ३८ धावा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कुलदीपला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या ऐवजी ३३ वर्षीय सारांशला कसोटी पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. सारांशने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांत १८८ विकेट घेतल्या आहेत. दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.एका क्रीडा वाहिनेच्या कार्यक्रमात बोलताना अर्नाल्ड म्हणाले, ‘श्रीलंकेच्या डाव्या हाताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑफ-स्पिनरला संघात समाविष्ट करणे योग्य ठरेल. परंतु हा निर्णय उद्यावरच सोडला पाहिजे; कारण खेळपट्टी पाहिल्यावरच परिस्थिती स्पष्ट होईल. खेळपट्टी कोरडी वाटली आणि स्टम्पच्या रेषेत सुरुवातीपासूनच वळण घेणारी असेल, तर सारांश जैन हा उत्तम पर्याय ठरू शकतो; पण जर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल वाटली आणि सामना पुढे जाईल तशी संथ होणार असेल, तर श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यासाठी कुलदीपची फिरकी आणि चातुर्य आवश्यक ठरेल.’
पराभवाची कारणमीमांसा
पहिल्या कसोटीत आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या डावात श्रीलंकेची सुरुवात ५ बाद ९०, तर दुसऱ्या डावात ४ बाद ४७ अशी होती. याबाबत बोलताना अर्नाल्ड म्हणाले, ‘श्रीलंकेसाठी ही समस्या बऱ्याच काळापासून कायम आहे. सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये गेल्या काही वर्षांत श्रीलंकेची सलामीची भागीदारी सर्वांत खराब राहिली आहे. त्यांची आकडेवारी फारशी चांगली नाही. पथुम निसांका हा त्यांचा सर्वोत्तम खेळाडू ठरला असला, तरी त्याचे सलामीचे जोडीदार सतत बदलत राहिले आहेत. १२-१३ कसोटी सामने खेळलेल्या निशाण मदुष्कानेही फारशी प्रभावी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे श्रीलंकेला या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.’