‘सात-चि’ने आव्हान राखले

Contributed byम. टा. क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘सात-चि’ने आव्हान राखले
पी. व्ही. सिंधू आणि आयुष शेट्टीच्या पराभवामुळे निराश झालेल्या भारतीय पाठीराख्यांना दिवसअखेर विजयाचा दिलासा लाभला. सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने जागतिक बॅडमिंटनमधील चुरशीची पुरुष दुहेरीची लढत जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदने भारतीय मोहिमेची गुरुवारी विजयी सुरुवात केली होती.

चिराग-सात्त्विकने ८१ मिनिटे रंगलेल्या दिवसाच्या अखेरच्या पुरुष दुहेरीतील सामन्यात जुनैद आरिफ-याप रॉय किंग यांचे आव्हान २१-२३, २१-१९, २१-१७ असे परतवून लावले. या विजयासह त्यांनी अखेरच्या आठ जोडीत प्रवेश केला. जागतिक स्पर्धेतील तिसरे पदक त्यांच्यापासून आता एक विजय दूर आहे.
'वंदे मातरम...', 'भारत माता की जय...' असे सूर आळवत प्रेक्षकांनी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा जोश कमी होणार नाही याची खबरदारी घेतली. यामुळेच सामना जिंकल्यावर सात्त्विक-चिराग यांनी सातत्याने साथ देणाऱ्या प्रेक्षकांच्या समुहाकडे बघून विशेष आभारही मानले. सिंधूच्या पराभवानंतर स्टेडियम सोडून गेलेल्या दर्दी प्रेक्षकांना सात्त्विक-चिरागची लोकप्रियताच पुन्हा घेऊन आली होती. अन् पराभव टाळत, प्रतिस्पर्ध्याच्या हातातोंडाशी आलेला विजय मिळवत ‘सात-चि’ यांनी आपल्या चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवला.

सात्त्विकचा खांदा दुखावल्यामुळे ही जोडी गेले तीन महिने एकाही स्पर्धेत सहभागी झालेली नाही. 'गुरुवारी खेळताना दुखऱ्या खांद्यात अवघडलेपण जाणवले नाही', असे सांगत सात्त्विकने हृदयावर हात ठेवत ईश्वराचे आभार मानले. 'चला आता सोडा आम्हाला... हॉटेलचे स्वयंपाक घर बंद होईल', असे सात्त्विक गंमतीने म्हणाला. त्यावर पत्रकारांनी, 'आम्ही तुला हवं तिथे जेवायला नेऊ', असे उत्तर दिले.