जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत कितीही प्रदुषण असले तरी इंडिया ओपन स्पर्धा ठरल्याप्रमाणे आणि तेव्हाच होईल, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाचे सरचिटणीस थॉमस लुंड यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
सकाळीच पत्रकार परिषद आयोजित करत त्यांनी हा निर्णय पत्रकारांना सांगत स्पर्धेची जणू घोषणाच केली. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतात येत असलेले बडे खेळाडू काही मोसमांपासून दिल्लीतील प्रदुषणाबाबत नाराजीचा सूर लावत आहेत. काही खेळाडू या स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय़ घेतात. इंडिया ओपन सुपर ७५० ही स्पर्धा जानेवारीऐवजी २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होईल. मात्र हा बदल कायम स्वरुपी नाही. २०२८च्या मोसमात ही स्पर्धा पुन्हा २५ ते ३० जानेवारी दरम्यानच रंगणार आहे.
'खेळाडूंच्या आरोग्याच्या दृष्टिने जागतिक महासंघाने स्पर्धांची सुरुवात जानेवारीत उशिरा केली आहे. ज्यामुळे मोसमातील अखेरच्या स्पर्धेनंतर विश्रांती मिळेल', असेही लुंड म्हणाले. दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियमच्या नूतनीकरणाचे त्यांनी कौतुक केले.