समय रैनासह चौघांवरील फौजदारी खटले रद्दबातल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
समय रैनासह चौघांवरील फौजदारी खटले रद्दबातल
नवी दिल्ली : दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी विनोदी कलाकार समय रैना आणि समाजमाध्यमांवरील अन्य चार प्रभावकांविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी कारवाई सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्दबातल ठरवली. तसेच दिव्यांग व्यक्तींचा सन्मान आणि जनजागृतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुकही केले.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने समय रैना याच्यासह विपुल गोयल, बलराज परमीतसिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांच्यावरील एफआयआर तसेच संबंधित फौजदारी कार्यवाही रद्द केली.
‘या प्रभावकांनी मार्च महिन्यात दिव्यांग व्यक्तींसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. तसेच स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीसारख्या (एसएमए) दुर्मीळ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांविषयी जनजागृती करण्याचे कामही त्यांनी केले,’ असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

‘प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून येतात. हे सर्व तरुण प्रतिभावान असून, त्यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू केली आहे,’ असेही खंडपीठाने नमूद केले.

‘एसएमए क्युअर फाउंडेशन’ने दाखल केलेल्या याचिकेत ‘इंडियाज गॉट लेटंट’ या कार्यक्रमातील काही विनोदी टिप्पणींबाबत आक्षेप घेण्यात आला होता. सुनावणीदरम्यान फाउंडेशनतर्फे हजर असलेल्या वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर संबंधित प्रभावकांनी संस्थेशी संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले.